वयाच्या ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सामाजिक, व्यावसायिक आणि शिवसेनेप्रती निष्ठावंत व्यक्तिमत्त्व हरपले

पालघर : शिवसेनेचे उपनेते तथा माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांचे वडील रमेश तुकाराम पिंपळे यांचे शनिवार १ ऑगस्ट २०२६ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंपळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पालघर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रमेश तुकाराम पिंपळे यांचा जन्म २४ मार्च १९३१ रोजी झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा सातत्याने अंगीकार केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी सुमारे १५ वर्षे रेल्वे पोलिस दलात सेवा बजावत शासकीय कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे वळत विविध व्यवसाय उभे केले. वीटभट्टी व्यवसाय, किराणा दुकान, ताडी व्यवसाय तसेच भात खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कष्ट, प्रामाणिक व्यवहार आणि लोकांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते परिसरात आदराचे स्थान मिळवून होते.
रमेश पिंपळे यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर दृढ श्रद्धा होती. शिवसेनेच्या सुरुवातीच्या विस्ताराच्या काळात त्यांनी पक्षाशी निष्ठा जपत कार्यकर्त्यांना वेळोवेळी मोलाची साथ दिली. विशेषतः १९८० च्या दशकात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर विविध कारणांनी गुन्हे दाखल होत असताना त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी आवश्यक ती आर्थिक व कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात रमेश पिंपळे यांचा मोठा सहभाग होता. अनेक शिवसैनिकांच्या अडचणीच्या काळात त्यांनी निःस्वार्थपणे मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर आणि आपुलकीची भावना निर्माण झाली होती.
सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. गरजू व्यक्तींना शक्य ती मदत करणे, गावातील विविध सामाजिक उपक्रमांना हातभार लावणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे ही त्यांची ओळख होती. त्यांच्या साध्या, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
त्यांच्या पश्चात मुलगे प्रीतम पिंपळे आणि शिवसेनेचे उपनेते तथा माजी जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, तसेच मुली पूनम संखे, नीलम पिंपळे आणि निशा संखे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि असंख्य शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
रमेश पिंपळे यांच्यावर रविवार २ ऑगस्ट रोजी मासवन येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामस्थ तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. बैठक, अकरावे आणि बारावेचे धार्मिक विधी त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
रमेश पिंपळे यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कार्याचा व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
