“कलेवर श्रद्धा, श्रमांवर विश्वास आणि गणरायाची कृपा असेल तर स्वप्ने सातासमुद्रापारही पोहोचतात,” याचे जिवंत उदाहरण म्हणजे तळगाव-पेडवेवाडी येथील अष्टपैलू कलाकार आणि प्रसिद्ध मूर्तिकार दिलीप उदाजी दळवी.

शालेय जीवनात स्वतःसाठी घडविलेल्या एका गणेशमूर्तीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. यंदा त्यांच्या कार्यशाळेतून तब्बल २०० पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अमेरिकेत रवाना झाल्या आहेत. दोन वर्षांत जवळपास अडीचशे मूर्ती परदेशात पोहोचल्या असून, हा प्रवास केवळ यशाचा नाही, तर जिद्द, कष्ट आणि भक्तीचा आहे.

शालेय शिक्षण घेत असतानाच दिलीप दळवी यांनी स्वतःसाठी वीणावादक गणेशाची मूर्ती साकारली. त्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “दिलीप, पुढच्या वर्षीपासून गणेशमूर्ती तयार कर,” असा आग्रह गावकऱ्यांनी धरला आणि त्याच क्षणापासून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. दहा-पंधरा मूर्तींपासून सुरू झालेली ही वाटचाल पुढे शेकडो मंगलमूर्ती घडविण्यापर्यंत पोहोचली. आज या साधनेला तब्बल २८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

हा प्रवास त्यांनी एकट्याने केलेला नाही. सुरुवातीला कुटुंबाची साथ लाभली. त्यानंतर पत्नी सौ. दीक्षा दळवी यांनी प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिली. आता मुलगा तेजस, जो बारावीत शिक्षण घेत आहे, वडिलांच्या कलेतील बारकावे आत्मसात करून त्यांचा खरा सहकारी बनला आहे. सातवीत शिकणारी मुलगी समृद्धी देखील या कलाप्रवासाची साक्षीदार आहे. संपूर्ण कुटुंब गणरायाच्या सेवेत एकरूप झाले आहे.

दिलीप दळवी हे केवळ मूर्तिकार नाहीत, तर एक बहुआयामी कलाकार आहेत. उत्कृष्ट चित्रकार, गायक, अभिनेते, हार्मोनियम वादक, भित्तीचित्रकार आणि गोड गळ्याचे भजनी गायक म्हणून ते “दिलीप बुवा” या नावाने सर्वदूर परिचित आहेत. अनेक भजन स्पर्धांमध्ये त्यांनी यश संपादन केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य भजनाची परंपरा पुढे नेत आहेत. फावल्या वेळेत ते स्वतःची रिक्षाही चालवतात. कला आणि कष्ट यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो.

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर ‘श्री गणेशाय मूर्तीकला केंद्र’ सुरू केले. गावातील गणेशमूर्तींच्या मागण्या वाढत गेल्या आणि त्यांची कला फुलत गेली. शाडूच्या शेकडो मूर्ती घडविताना संपूर्ण कुटुंब या कामात सहभागी झाले. त्याचबरोबर त्यांनी गोमय आणि कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले.

परदेशात जाणाऱ्या सर्व मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केल्या जातात. त्या वजनाने हलक्या, टिकाऊ आणि वाहतुकीसाठी सोयीच्या असल्याने अमेरिकेतील गणेशभक्तांनी त्यांना मोठी पसंती दिली आहे. तर स्थानिक भाविकांच्या श्रद्धेनुसार शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात. एका मित्राने दाखविलेल्या मार्गामुळे अमेरिकेचे दार उघडले आणि आज तळगावच्या मातीचा सुगंध सातासमुद्रापार पोहोचला आहे.

“शून्य ते दोनशे” हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. तो असंख्य कष्ट, संयम, चिकाटी आणि गणरायावरील अखंड श्रद्धेचा परिणाम आहे. हा व्यवसाय त्यांना वडिलोपार्जित मिळालेला नाही; स्वतःच्या मेहनतीने त्यांनी तो उभा केला आहे. आज त्यांच्या यशाचा अभिमान केवळ तळगाव-पेडवेवाडीपुरता (तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) मर्यादित नाही, तर संपूर्ण कोकणाला आहे.

गणेशभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि कलेचा अद्वितीय संगम घडविणारे दिलीप बुवा दळवी यांचा हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या हातून घडणाऱ्या मंगलमूर्तींप्रमाणेच त्यांची यशोगाथा अधिकाधिक उंच भरारी घेऊ दे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.



मंगेश तावडे (7721994798) मुंबई
