पालघर : मंगेश तावडे
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणातून (जेएनपीए) कंटेनरची जलद आणि कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल (भा.प्र.से.) आणि उपाध्यक्ष रवीश सिंह (भा.रे.वा.से.) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) वरील महत्त्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधांची पाहणी केली.या पाहणीदरम्यान शिष्टमंडळाने नव्याने विकसित करण्यात आलेल्या न्यू खारबाव रेल्वे स्थानकाची पाहणी केली.

जेएनपीएमधून भिवंडीतील प्रमुख उपभोग व वितरण केंद्रांकडे कंटेनरयुक्त मालाची वाहतूक अधिक जलद आणि सुरळीत करण्यासाठी न्यू खारबाव स्थानकाचे धोरणात्मक एकत्रीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. रेल्वे वाहतुकीचा वापर वाढल्यास मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होण्यासोबतच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
यानंतर पथकाने भिवंडीतील प्रमुख वेअरहाऊसिंग हबची पाहणी करून पुरवठा साखळीची क्षमता, लास्ट-माईल लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता आणि साठवणूक व्यवस्थेचा आढावा घेतला. पाहणीच्या अंतिम टप्प्यात निळजे रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात आली. विस्तारत असलेल्या रेल्वे मालवाहतूक व्यवस्थेत निळजे हे अतिरिक्त महत्त्वाचे मालवाहतूक केंद्र म्हणून कितपत उपयुक्त ठरू शकते, याचेही मूल्यांकन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष गौरव दयाल यांनी आधुनिक बंदरांच्या कार्यक्षम संचालनासाठी मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असल्याचे सांगितले. डीएफसीचा अधिकाधिक वापर करून भिवंडीसारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांपर्यंत कंटेनर वाहतूक जलद, सुरळीत आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जेएनपीए प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपाध्यक्ष रवीश सिंह यांनी कंटेनर वाहतुकीतील अधिकाधिक हिस्सा रस्त्यांवरून रेल्वेकडे वळवणे आवश्यक असल्याचे नमूद केले. हा उपक्रम पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनशी सुसंगत असून, देशातील मल्टिमोडल लॉजिस्टिक्स व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
