संत नरहरी सोनार महाराज समाजभवनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन
नवीन पनवेल : नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभा शनिवार, २६ सप्टेंबर रोजी नवीन पनवेल (पूर्व) येथे उत्साहात पार पडली. मंडळाच्या कार्यालयात विद्युत समस्येमुळे ही सभा सचिव विजयजी भामरे यांच्या सेक्टर ११ येथील ‘सिंधुरेखा विला’ या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.
सभेच्या प्रारंभी सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष अनुपस्थित असल्याने उपाध्यक्ष हेमकांत पुरुषोत्तम सोनार यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सचिव विजयजी भामरे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मागील सभेचा आढावा वाचून दाखविण्यात आला. सभेच्या पत्रिकेतील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सुवर्णकार समाजाचे एकच स्वप्न असलेल्या श्री संत नरहरी सोनार महाराज समाजभवनाच्या उभारणीसाठी सर्व समाजबांधव-भगिनींचे योगदान महत्त्वाचे असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.
यावेळी पदसिद्ध युवक अध्यक्ष चंद्रकांत विसपुते, महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीताताई विसपुते, ज्येष्ठ सदस्य उदय विभांडिक, सहसचिव मनोज सोनार, सहकोषाध्यक्ष मिलिंद खरोटे, योगेश रणधीर, डॉ. सिद्धार्थ सोनार, रेखाताई विजय भामरे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष हेमकांत सोनार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
