वाडा | प्रतिनिधी
कोनसई येथील अवैध फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. या स्फोटात दोन निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. प्रफुल पाटील यांनी सांगितले की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी परिपत्रक काढून ग्रामपंचायतींकडील ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याचे अधिकार काढून घेतले. यामुळे स्थानिक पातळीवरील नियंत्रण कमी झाले असून उद्योजकांना मनमानी करण्यास वाव मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
वाडा औद्योगिक संघटनेच्या तक्रारीनंतर व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे ग्रामपंचायत व पेसा क्षेत्रातील ग्रामसभांचे अधिकार कमी झाले. परिणामी, कोणतेही स्थानिक निरीक्षण किंवा हरकत न घेता रासायनिक व प्रदूषणकारी उद्योग उभारले जात असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला.
कोनसई येथील दुर्घटना ही याच धोरणाचा परिणाम असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, अशा कारखान्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. उद्योगाचे स्वरूप, उत्पादन, प्रदूषणाचा परिणाम किंवा सांडपाण्यामुळे होणारे नुकसान याबाबत स्थानिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये, तर जखमींना ५ लाख रुपयांची तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.चौकट : शासन परिपत्रकाला हरताळ?ग्रामविकास विभागाने १९ ऑक्टोबर २०२० रोजी ग्रामपंचायतींना औद्योगिक व व्यावसायिक वापरासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याचे अधिकार दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून हे अधिकार स्वतःकडे केंद्रीत केल्याने शासनाच्या धोरणालाच हरताळ फासल्याचा आरोप प्रफुल पाटील यांनी केला आहे.
