पालघर : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील कर्तव्यात गंभीर कसूर केल्याप्रकरणी वसई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा 132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी गोपाळ चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात नियुक्ती होऊनही त्यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता कर्तव्यावर गैरहजर राहत कामकाज केले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
याशिवाय एस आय आर कार्यक्रमात हलगर्जीपणा, दुर्लक्ष, कामात टाळाटाळ आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळे 132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाला असून अनेक कामे अपूर्ण राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 आणि संबंधित नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा भारत निवडणूक आयोगाचा अत्यंत महत्त्वाचा आणि कालबद्ध उपक्रम असून, या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा कर्तव्यातील कसूर अजिबात खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
