खेळण्यातील चुंबक ठरणार होते जीवघेणे, १० वर्षीय मुलाची थरारक सुटका

मुंबई : खेळताना चुंबकीय धातूचे अनेक लहान तुकडे (मॅग्नेट) गिळल्यामुळे १० वर्षीय मुलाचा जीव धोक्यात आला होता. मात्र वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील डॉक्टरांनी वेळेत शस्त्रक्रिया करून मुलाचे प्राण वाचवले. हा मुलगा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी)ने ग्रस्त असल्याने अन्न नसलेल्या वस्तू तोंडात टाकण्याची त्याला सवय होती.

पोटदुखी आणि सतत उलट्या होत असल्याने मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. बादशाह खान यांनी तपासणीदरम्यान आतड्यात अडथळा असल्याचा संशय व्यक्त केला. एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये लहान आतड्यात अनेक मॅग्नेट अडकले असल्याचे स्पष्ट झाले. कोलोनोस्कोपी करूनही ते बाहेर काढणे शक्य झाले नाही.

यानंतर डॉ. भावेश दोशी आणि डॉ. प्रदीप शेनॉय यांनी तातडीची शस्त्रक्रिया करून सर्व मॅग्नेट सुरक्षितपणे बाहेर काढले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे आतड्याला छिद्र पडणे, संसर्ग होणे आणि कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका टळला. शस्त्रक्रियेनंतर मुलाची प्रकृती सुधारली असून आठवडाभरानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

डॉ. बादशाह खान यांनी सांगितले की, एकापेक्षा जास्त मॅग्नेट गिळल्यास ते आतड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकमेकांना चिकटून गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात. त्यामुळे मॅग्नेट किंवा बटण बॅटरी गिळल्याचा संशय आला तरी विलंब न करता तातडीने रुग्णालयात जावे.

वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांनी पालकांना मॅग्नेटिक खेळणी, बटण बॅटऱ्या, नाणी आणि इतर लहान धातूच्या वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवण्याचे आवाहन केले असून, अशा वस्तू गिळल्यास घरगुती उपाय न करता त्वरित वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button