पालघर जिल्ह्यात १०५.१० कोटींची कर्जमाफी : जिल्हाधिकारी

५,३९४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

पालघर : मंगेश तावडे

राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची १०५ कोटी १० लाख ७० हजार रुपयांची कर्जरक्कम माफ होणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १० हजार ४८४ पात्र कर्जखात्यांपैकी ५ हजार ३९४ शेतकऱ्यांनी २९ जुलैपर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून ५ हजार ९० शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत केले.

योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले पीक कर्ज, पुनर्गठित व फेरपुनर्गठित पीक कर्ज पात्र ठरणार असून ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (OTS) योजना लागू असून अतिरिक्त रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत भरल्यानंतर त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. तसेच सलग वेळेत कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १४ हजार ५३ कर्जखाती योजनेसाठी सादर करण्यात आली असून त्यात ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १३,०७१ आणि व्यापारी बँकांची ९८२ कर्जखाती आहेत.

तालुकानिहाय आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये वाडा (१,०३१), पालघर (१,०१२), विक्रमगड (८६३), मोखाडा (८१७) आणि डहाणू (६७७) आघाडीवर आहेत. तर प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोखाडा (१,६५५), डहाणू (१,२६८), तलासरी (७३२), जव्हार (५०७), पालघर (३२७), वाडा (३१४), विक्रमगड (२६३) आणि वसई (२४) यांचा समावेश आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button