पर्यावरण दिनानिमित्त चटाळे येथे परसबाग बियाणे वाटप व आरोग्य शिबिर

पालघर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या प्रेरणेतून संपदा लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी), पालघर यांच्या वतीने चटाळे येथे परसबाग बियाणे वाटप व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, पोषण सुरक्षा आणि आरोग्य जागरूकता यांचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महिलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून देत घरगुती परसबाग तयार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ७० महिलांना परसबाग बियाणे किटचे वितरण करण्यात आले. यामुळे कुटुंबांना ताज्या व पोषणयुक्त भाज्यांचा पुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात चटाळे गावच्या सरपंच सौ. वनश्री गायकवाड तसेच डॉ. अनिता भोईर यांनी पर्यावरण आणि आरोग्य यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत मार्गदर्शन केले. यावेळी ७० महिलांची रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.

कार्यक्रमास संपदा सीएमआरसीच्या अध्यक्षा प्रज्ञा कुलकर्णी, सचिव विद्या मोरे, उपसरपंच प्रज्ञा वर्तक, पोलीस पाटील प्रणिता मोहिते, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक चंदना जाधव यांनी केले. त्यांनी हवामान बदल या विषयावर जनजागृती केली. शेवटी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button