पालघर : विष्णू सवरा सामाजिक न्यास, इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स (IPOD), मुंबई आणि मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बालकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय, आर्यन हायस्कूलजवळ, पालघर येथे होणार आहे.
या शिबिरात पालघर जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. जन्मजात अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी (मेंदू पक्षाघात), जन्मतः हात किंवा पाय वाकडे असणे, कंबरेखालच्या भागातील विकृती, हात-पायांच्या लांबीतील असमानता, हाड मोडल्यामुळे किंवा संसर्गामुळे आलेले वाकडेपण, चालताना होणारी अडचण तसेच सांधेदुखी आणि हाडांच्या विविध व्याधींवर मार्गदर्शन व उपचारांची माहिती दिली जाणार आहे.
शिबिरात प्रख्यात बाल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तरल नागदा आणि डॉ. जयदीप धनले हे बालकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला देणार आहेत. या दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांना बाल अस्थिरोग क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून अनेक दिव्यांग बालकांना उपचारांद्वारे नवे आयुष्य मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून पालकांनी आपल्या पाल्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 9867934469, 8805746099, 9970811202 आणि 8976029494 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
दिव्यांग बालकांना योग्य वेळी उपचार, मार्गदर्शन आणि तज्ज्ञ सल्ला उपलब्ध व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा पालघर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विष्णू सवरा सामाजिक न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.
