पालघर : तालुका विधी सेवा समिती, पालघर आणि माहीम ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध व जनजागृती या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन माहीम येथील ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका यांनी केले. अपर जिल्हा न्यायालय, पालघर येथील लिपिक उमेश भागवत यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि अनमोल मार्गदर्शन प्रखरपणे करीत मुलींना कायदेविषयक सल्ला तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती ए. के. चौधरी-इनामदार यांनी दिला.
कार्यक्रमात बालसंरक्षण अधिकारी मिलिंद दोंदे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सातपाटी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सोनी जवादे यांनी बालविवाह रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेची भूमिका व तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया स्पष्ट केली.
यावेळी श्री. दोंदे आणि सोनी जवादे यांनी मुलांबरोबर चर्चा करून प्रश्न जाणून घेतले. तसेच हेल्प लाईन सुद्धा स्पष्ट केली.
यावेळी पालघर वकील बार असोसिएशनचे वकील अजिंक्य म्हस्के यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा व संबंधित शिक्षेची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमास सरपंच प्रीती पाटील, उपसरपंच नरोत्तम राऊत, ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ थेटे, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, भुवनेश कीर्तने विद्यालयातील विद्यार्थीनी, शिक्षकवर्ग तसेच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत कार्यालय माहीम यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्री. थेटे यांनी मानले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये बालविवाह प्रतिबंधाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
