तीन वर्षांत 5 लाखांहून अधिक तपासण्या; 2600 रुग्णांची नोंद
पालघर : मंगेश तावडे
पालघर जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती वाढविण्यासाठी 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकलसेल जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये या सप्ताहांतर्गत तपासणी शिबिरे, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात 2021 पासून आतापर्यंत एकूण 5 लाख 14 हजार 934 नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली आहे. या तपासण्यांमध्ये 12 हजार 421 सिकलसेल वाहक तर 975 सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात सध्या एकूण सुमारे 2600 सिकलसेल रुग्णांची नोंद असून, या सर्व रुग्णांची माहिती सिकलसेल पोर्टलवर ऑनलाईन नोंदविण्यात आली आहे.

सिकलसेल आजार हा अनुवांशिक व रक्तपेशींशी संबंधित आजार आहे. आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये हा आजार संक्रमित होतो. सिकलसेलमध्ये लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व कठीण होतात. या पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकून रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. परिणामी रुग्णांना तीव्र वेदना, थकवा तसेच विविध अवयवांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. डोळे, यकृत, प्लीहा, त्वचा व पित्ताशयावर या आजाराचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
या आजारावर पूर्ण उपचार नसला तरी योग्य काळजी, नियमित उपचार व समतोल आहारामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सिकलसेलचा प्रसार रोखण्यासाठी वाहक-वाहक, वाहक-रुग्ण किंवा रुग्ण-रुग्ण यांच्यात विवाह टाळणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
सिकलसेल रुग्णांना शासनामार्फत मोफत औषधोपचार, आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा, समुपदेशन सुविधा दिली जाते. तसेच संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आर्थिक लाभही मिळतो. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान प्रत्येक पेपरसाठी 20 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येतो. शिवाय बस प्रवासातही सवलत दिली जाते.
सिकलसेल आजाराची लक्षणे म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे, हातपाय सुजणे, भूक न लागणे, सांधेदुखी, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, लहान मुलांमध्ये वारंवार जंतुसंसर्ग होणे व शरीर पिवळसर होणे इत्यादी.
जास्तीत जास्त नागरिकांनी आपली सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी केले आहे.
