विलये गावी ८ ऑगस्टला स्वामी समर्थ पादुकांचे ऐतिहासिक आगमन

स्वामीसूत महाराज जन्मस्थळ नामफलकाचेही अनावरण

मुंबई : श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त आणि स्वामींचे ‘हमारे हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे श्री हरिभाऊ दाजीबा तावडे (स्वामीसूत महाराज) यांच्या स्मृतींना उजाळा देणारा ऐतिहासिक सोहळा येत्या ८ ऑगस्ट २०२६ रोजी विलये ग्रामात पार पडणार आहे. या दिवशी स्वामीसूत महाराजांच्या जन्मस्थळाचा नामफलक अनावरण सोहळा तसेच स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे आगमनही होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये तसेच भक्तजनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री स्वामी समर्थ महाराजांनी आग्रहाने श्री स्वामीसुत महाराज यांना आग्रहाने पादुका तयार करण्यास सांगितले आणि त्या पादुका सलग १४ दिवस आपल्या चरणी धारण केल्या होत्या. त्यानंतर त्या पादुका आत्मलिंग स्वरूपात प्रसाद म्हणून स्वामीसुत महाराजांना प्रदान केल्या. विशेष म्हणजे, तब्बल १६० वर्षांनंतर स्वामीसुत महाराजांचे वंशज मठातील पूजेत असलेल्या या पवित्र पादुका घेऊन आपल्या मूळ गावी येत आहेत. हा क्षण संपूर्ण विलये ग्रामासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक मानला जात आहे.हा मुख्य कार्यक्रम शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता झुंजारवाडी, मधलीवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्वामीसूत महाराज जन्मस्थळ नामफलक अनावरण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा भव्य सोहळा पार पडणार आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवार, २३ जून रोजी गावातील ज्येष्ठ कुलबंधू सुहास तावडे, सुबोध तावडे, रवी तावडे, संतोष तावडे तसेच स्वामीसूत महाराजांचे वंशज विजय नलावडे यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक संपन्न झाली. बैठकीत कार्यक्रमाची रुपरेषा, नियोजन आणि जबाबदाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली.

विलये ग्रामस्थ व तावडे कुलबंधू यांनी सर्व ग्रामस्थांना या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button