पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
पालघर तालुक्यातील सातपाटी गावातील जया माच्छी यांच्या कुटुंबाचे घर समुद्राच्या भरतीच्या लाटा आणि मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या संकटामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले होते. गावकऱ्यांनी या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेत शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची माहिती मिळताच कुंदन संखे यांनी तातडीने मदतीचे आश्वासन देत ते प्रत्यक्षातही पूर्ण केले.

कुंदन संखे यांनी जयाताई माच्छी यांच्या नव्या घराच्या उभारणीसाठी ५७ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच सातपाटी येथे प्रत्यक्ष भेट देऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला. नव्या घरासाठी त्यांनी दूरदर्शन संच (टीव्ही) भेट देत कुटुंबाला आणखी आधार दिला. त्यांच्या या मदतीमुळे जयाताई यांच्या कुटुंबाच्या नव्या घराचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत झाली असून गावकऱ्यांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर, सातपाटीचे माजी सरपंच अरविंद पाटील, शाखाप्रमुख हिलेश चौधरी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. संकटाच्या काळात दिलेला शब्द पाळत गरजू कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल कुंदन संखे यांच्या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.


