पालघरमध्ये ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पालघर : भटके व विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी जनजागृती व समन्वय आवश्यक असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी सांगितले.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पालघर यांच्या वतीने सोमवारी (दि. ३१) सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शासकीय अधिकारी, अशासकीय सदस्य, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सहाय्यक संचालकांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. वनार्टी, महाज्योती, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासह विविध महामंडळांच्या माध्यमातून उपलब्ध शैक्षणिक, आर्थिक व विकासाच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. प्रकाश हसनाळकर व दुर्गेश चव्हाण यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. युवकांनी शिक्षण, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांचा प्रभावी उपयोग करून प्रगती साधावी, असे आवाहन डॉ. हसनाळकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे आणि पालघरचे तहसीलदार तुषार शिंदे उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भटके विमुक्त दिवसानिमित्त जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शुभांगी लोणकर व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी तुषार डामसे यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button