शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, केवळ पदवी मिळविण्याचे साधन नव्हे आणि केवळ रोजगाराची वाट दाखविणारी व्यवस्था नव्हे. शिक्षण म्हणजे माणूस घडविण्याची प्रक्रिया, विचारांना आकार देण्याचे माध्यम आणि समाजाच्या भवितव्याची पायाभरणी. या व्यापक अर्थाने शिक्षणाकडे पाहत, आपल्या प्रदीर्घ कार्यातून शिक्षणसेवेला सामाजिक बांधिलकीचे रूप देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. वागेश सदानंद कदम.
वयाची सत्तरी पूर्ण करताना त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले, तर समोर येते ती केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही; तर शिक्षण, संस्कार, संस्था उभारणी, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी यांचा समृद्ध प्रवास आहे. गेली पाच दशके शिक्षणक्षेत्राशी एकरूप होऊन काम करताना त्यांनी संस्थेला केवळ विस्तार दिला नाही, तर तिच्या कार्याला व्यापक सामाजिक आशय प्राप्त करून दिला.‘शिक्षण ही सेवा आहे’ हा विचार त्यांनी केवळ बोलून दाखविला नाही; तो आपल्या कृतीतून जगला. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक देतानाच त्यांच्या मनात मूल्यांची रुजवणूक व्हावी, ज्ञानाबरोबर विवेक वाढावा, गुणवत्तेबरोबर संवेदनशीलता निर्माण व्हावी आणि शिक्षणातून जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
शिक्षणक्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा बारकाईने वेध घेताना त्यांनी काळाची पावले ओळखली. पारंपरिक शिक्षणपद्धतीची मूल्ये जपत आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील प्रयोगशीलता, तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि बदलत्या सामाजिक गरजा यांचा मेळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. त्यामुळेच ‘शिक्षणविज्ञ’ ही त्यांची ओळख केवळ संबोधनापुरती मर्यादित राहत नाही; ती त्यांच्या दीर्घ अनुभवातून आणि कार्यातून सिद्ध होते.
संस्थाविस्तारातून शिक्षणाचा व्यापक वटवृक्षजीवन विकास शिक्षण संस्थेच्या उभारणीपासून विस्तारापर्यंतच्या प्रवासात श्री. वागेश कदम यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष म्हणून गेली पाच दशके त्यांनी संस्थेच्या वाटचालीत सक्रिय योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर, शिगांव आणि दांडी येथील अनुदानित माध्यमिक विद्यालये व अनुदानित आश्रमशाळांच्या शैक्षणिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले.शिक्षणाची क्षितिजे अधिक विस्तृत करताना पालघर येथे श्री. स. तु. कदम प्राथमिक विद्यालय, श्री. स. तु. कदम आर्ट्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज आणि श्री. स. तु. कदम इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) अशा विविध शैक्षणिक शाखांची उभारणी झाली. दांडी येथे अणु विकास इंग्लिश मीडियम स्कूल, तर शिगांव आश्रमशाळेत आर्ट्स व सायन्स निवासी ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात आले.
ही केवळ संस्थेच्या विस्ताराची आकडेवारी नाही. प्रत्येक नव्या शैक्षणिक उपक्रमामागे ग्रामीण, आदिवासी आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली व्हावीत, हा व्यापक विचार असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते.
एखादी संस्था मोठी होणे ही एक बाब; पण त्या संस्थेशी जोडलेली माणसे मोठी होणे ही त्याहून महत्त्वाची बाब. श्री. वागेश कदम यांच्या कार्यपद्धतीत याच मानवी दृष्टिकोनाचे दर्शन घडते.संस्थाचालक नव्हे, कुटुंबातील ज्येष्ठसंस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी त्यांनी केवळ पदाच्या नात्याने संबंध ठेवले नाहीत. त्यांच्याशी निर्माण झालेले जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र ओळख आहे. संस्थेतील सहकाऱ्यांसाठी ते केवळ अध्यक्ष किंवा संस्थाचालक नसून, अडचणीच्या वेळी आधार देणारे आणि योग्य वेळी दिशा दाखविणारे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती राहिले आहेत.
शिस्त आणि माणुसकी, परंपरा आणि परिवर्तन, अनुभव आणि प्रयोगशीलता, ज्ञान आणि सामाजिक जाणीव—या परस्परपूरक मूल्यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जाणवतो.या व्यक्तिमत्त्वामागे त्यांच्या वडिलांचा, शिक्षणमहर्षी श्री. स. तु. कदम यांचा समृद्ध शैक्षणिक आणि सामाजिक वारसा आहे. त्या वारशाचे केवळ जतन न करता, काळाच्या गरजेनुसार त्याला नवे आयाम देण्याचे काम श्री. वागेश कदम यांनी केले. त्यामुळे त्यांच्या कार्याकडे पाहताना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली मूल्यपरंपरा आणि त्या परंपरेला मिळालेली आधुनिकतेची जोड यांचा प्रत्यय येतो.
शिक्षणाच्या पलीकडे माणसांशी जोडलेले नातेशिक्षणसंस्था उभारणाऱ्या अनेक व्यक्ती असतात; मात्र संस्थेच्या चार भिंतींपलीकडे जाऊन समाजाशी नाते जोडणारी माणसे विरळा. श्री. वागेश कदम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे.
पालघरमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ चळवळीतील ऐतिहासिक मोर्चाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक कुटुंबांना एकत्र आणत पालघरमध्ये ‘सिंधुरत्न उत्कर्ष मंडळा’चे अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमांना चालना दिली. या कार्यातून त्यांच्या संघटनक्षमतेसोबतच समाजाशी असलेली आत्मीयताही अधोरेखित होते.
राजकीय पदावर नसतानाही पालघर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला प्रभाव हा त्यांच्या दीर्घ सामाजिक संपर्काचा आणि माणसांशी जपलेल्या विश्वासाच्या नात्याचा परिणाम आहे. पदापेक्षा कामाला आणि अधिकारापेक्षा जबाबदारीला महत्त्व देणारी त्यांची कार्यशैली म्हणूनच अनेकांना भावते.
अनुभवाची शिदोरी, भविष्याची दिशासात दशकांचा जीवनप्रवास पूर्ण करताना श्री. वागेश कदम यांच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी आहे. बदलत्या शिक्षणव्यवस्थेचा प्रदीर्घ अनुभव, संस्थेच्या विस्ताराचे प्रत्यक्ष ज्ञान, शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि समाजजीवनाचा व्यापक परिचय ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद आहे.आता पालघर जिल्हा संस्थाचालक संघाच्या पुढील वाटचालीत त्यांचा अनुभव, अभ्यास आणि मार्गदर्शन शिक्षणक्षेत्राला अधिक सक्षम दिशा देणारे ठरावे, अशी अपेक्षा स्वाभाविक आहे. नव्या पिढीसमोर शिक्षणाची बदलती आव्हाने उभी असताना अनुभवी नेतृत्वाचा आधार आणि मूल्याधिष्ठित दृष्टिकोन निश्चितच महत्त्वाचा ठरतो.
श्री. वागेश कदम यांचा प्रवास एका वाक्यात सांगायचा झाला, तर तो ‘शिक्षणातून संस्था आणि संस्थेतून समाज घडविण्याचा प्रवास’ आहे. त्यांनी ज्ञानाची ज्योत एका हातातून दुसऱ्या हातात देण्याचे काम केले; त्या ज्योतीतून अनेक पिढ्यांच्या आयुष्याला प्रकाश मिळाला. सात दशकांचे वय म्हणजे आयुष्याचा एक टप्पा; पण ज्ञानसेवेची वाटचाल वयाच्या आकड्यांनी थांबत नाही. उलट अनुभवाची वर्षे वाढत जातात तसतसे मार्गदर्शनाचे महत्त्व अधिक गहिरे होत जाते.
शिक्षणसेवेची पाच दशके, अनुभवाची सात दशके आणि समाजाशी जोडलेली असंख्य माणसे—हीच श्री. वागेश कदम यांच्या कार्यकर्तृत्वाची खरी संपत्ती.त्यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी काळातही शिक्षणक्षेत्र व समाजासाठी त्यांच्या अनुभवाचा प्रकाश अखंड तेवत राहो, हीच मनःपूर्वक मंगलकामना!
- मंगेश तावडे, 7721994798
