पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा पादचारी पूल मंजूर; निविदा प्रक्रिया सुरू

खा. डॉ. हेमंत सवरा यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा दिलासा

पालघर : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय झाला असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड–दहिसर मार्गावर सहा पादचारी उड्डाणपूल (Foot Over Bridge) उभारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही माहिती पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी दिली.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या महामार्गावर पादचारी उड्डाणपूल उभारावेत, यासाठी खासदार डॉ. सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयामार्फत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड ते दहिसर (कि.मी. ३८१.००० ते ५०२.०००) या मार्गावर EPC पद्धतीने सहा पादचारी उड्डाणपूल बांधण्याच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

प्रस्तावित उड्डाणपुलांची ठिकाणे

तलासरी – चेनज ३९५+५२०

निलगिरी हॉटेल – चेनज ३९६+५००

आंबोली – चेनज ४०६+५५०

खानिवडे – चेनज ४६६+९००

बापानेफाटा,

ससुनवघर

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांना दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत होता. अनेक अपघातांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पादचारी उड्डाणपुलांची मागणी जोर धरत होती. निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून, भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आणि नागरिकांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडता येण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button