नवी दिल्ली | २९ जुलै २०२६ (राजतंत्र वृत्तसेवा)
पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांचे समुद्राच्या धूप, भरतीच्या उधाण आणि चक्रीवादळांपासून संरक्षण करण्यासाठी आपत्ती निवारण (Disaster Mitigation Scheme) योजनेअंतर्गत सागरी संरक्षक भिंती उभारण्यासाठी ₹१२२.२६ कोटींच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन केंद्रीय निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी (२९ जुलै) नवी दिल्ली येथे गृहमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
डॉ. सवरा यांनी निवेदनात नमूद केले की, सुमारे ११० किलोमीटर लांबीची किनारपट्टी असलेल्या पालघर जिल्ह्यात दरवर्षी समुद्राची धूप, भरतीचे उधाण, चक्रीवादळे आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे किनारपट्टीवरील अनेक गावांना मोठा फटका बसत आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरल्याने घरे, शेती, बागायती, रस्ते आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून हजारो मच्छीमार आणि किनारी भागातील नागरिकांच्या उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील अतिधोकादायक किनारी भागांमध्ये सागरी संरक्षक भिंती उभारण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. या प्रस्तावात पालघर आणि डहाणू तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ कामांचा समावेश असून त्यासाठी ₹१२२२६.७६ लाख (सुमारे ₹१२२.२६ कोटी) निधीची मागणी करण्यात आली आहे.
या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन आपत्ती निवारण निधीतून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती खासदार डॉ. सवरा यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. हा प्रकल्प मंजूर झाल्यास किनारपट्टीवरील हजारो कुटुंबांचे जीव, मालमत्ता आणि उपजीविका सुरक्षित होण्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
