पालघर : रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन आणि मारहाण केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेनेने पालघर जिल्ह्यातील सात पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, जिल्हाप्रमुख कुंदन बाळकृष्ण संखे, शहरप्रमुख राहुल रामदास घरत, उपतालुका प्रमुख युवासेना मनीष ऊर्फ विकी संखे, जिल्हाप्रमुख युवासेना साईराज पाटील, उपतालुका प्रमुख रोहित गावित, उपशहरप्रमुख राहुल संखे आणि युवासेना विधानसभा समन्वयक ऋषभ वारे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून तसेच शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांवर बेजबाबदार वर्तन आणि पक्षशिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, याच प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल रामदास घरत याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झाल्यानंतर पालघर शहरातील रिलीफ रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या गोविंदाला रुग्णालयातून सोडवून नेण्याच्या प्रयत्नात डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
सोमवारी राहुल घरत पालघर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पालघर दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.डोंबिवाीच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी झालेल्या कथित मारहाणीमुळे आधीच चर्चेत आलेल्या या प्रकरणाला आता शिवसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे राजकीय वळण मिळाले आहे. पक्षाने घेतलेल्या या कठोर कारवाईमुळे पालघरच्या राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
