खालापूर (रायगड), दि. ३ : राजतंत्र वृत्तसेवा
रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत खालापूर तालुक्यातील खारीवली ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ सोहळ्यात खारीवली ग्रामपंचायतीला १ कोटी रुपयांच्या पुरस्कारासह गौरविण्यात आले.
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी खारीवली ग्रामपंचायतीची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह), केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि आसाम सरकारचे मंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खारीवली ग्रामपंचायतीने जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, जलस्रोतांचे संवर्धन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे देशातील सर्वोत्तम ‘जलसमृद्ध पंचायत’ म्हणून मानाचा किताब मिळविला. या यशामुळे रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांतर्गत दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण अशा विविध निकषांवर पंचायतींचे मूल्यमापन करण्यात आले. पंचायत प्रगती निर्देशांकाच्या आधारे देशभरातील उत्कृष्ट पंचायतींची निवड करण्यात आली.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राने विशेष कामगिरी करत अनेक पुरस्कारांवर आपला ठसा उमटविला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही पंचायत’ श्रेणीत प्रथम क्रमांक मिळविला, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीने ‘सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा’ श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावला.
खारीवली ग्रामपंचायतीच्या या यशामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामविकास, जलव्यवस्थापन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
