राज्यात गुटखा माफियांवर धडक कारवाई; १.५८ कोटींचा साठा जप्त, १०२ जण गजाआड

मुंबई, दि. ३ : राजतंत्र वृत्तसेवा

राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या काळ्या बाजाराला अन्न व औषध प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. अवघ्या सात दिवसांत राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून १०२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच २०३ आस्थापनांवर कारवाई करत ८६ आस्थापने सील करण्यात आली आहेत.

(बातमीमध्ये आर्ट वर्क तयार करण्यात आले आहे, त्यासाठी AI चा उपयोग करण्यात आला आहे..)


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २५ ते ३१ मे २०२६ दरम्यान राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीविरोधात १३० ठिकाणी छापे टाकण्यात आले.


कारवाईतील ठळक मुद्दे :
● एकूण जप्ती : ₹१.५८ कोटींचा साठा
● एकूण अटक : १०२ आरोपी
● कारवाई झालेली आस्थापने : २०३
● सील केलेली आस्थापने : ८६
● गुटखा-पानमसाला कारवाईत जप्त मुद्देमाल : ₹३४.०५ लाख
विभागनिहाय कारवाई :
● कोकण विभाग – ४७ कारवाया, ४६ अटक
● बृहन्मुंबई – २२ कारवाया, २३ अटक
● पुणे – १४ कारवाया, १३ अटक
● नाशिक – ५ कारवाया, ५ अटक
● छत्रपती संभाजीनगर – ८ कारवाया, ८ अटक
● अमरावती – ५ कारवाया, ५ अटक
● नागपूर – २ कारवाया, २ अटक


याशिवाय भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातही मोठी मोहीम राबविण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपये किमतीचा आणि ९० हजार ६३९ किलो वजनाचा संशयित निकृष्ट अन्नसाठा जप्त करण्यात आला.
आंबे, खवा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, कुल्फी, खाद्यतेल, मसाले, गूळ, चिक्की, बेकरी पदार्थ आदी अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात आणखी कठोर कारवाई केली जाईल.”
तक्रार नोंदविण्यासाठी :
● टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५
● ई-मेल : jc-foodhq@nic.in
भेसळयुक्त किंवा संशयास्पद अन्नपदार्थांची माहिती नागरिकांनी प्रशासनाला देऊन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button