जवाहर नवोदय विद्यालय, पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पालकांचा प्रशासनाला इशारा

पालघर : जवाहर नवोदय विद्यालय, पालघर येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य व मूलभूत सुविधांबाबत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत पालक-शिक्षक समिती (PTC) सदस्य व पालकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी पालघर जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्याकडे केली आहे. निवासी शाळा असल्याने विद्यार्थी दिवसरात्र परिसरात राहत असताना त्यांच्या सुरक्षेबाबत मोठ्या त्रुटी असल्याचे समोर आले आहे.

शाळेच्या सीमारेषेचा प्रश्न गंभीर बनला असून स्थानिक नागरिकांबरोबर रस्त्याच्या वापराबाबत वाद सुरू आहेत. स्पष्ट कंपाउंड वॉल नसल्यामुळे बाहेरील व्यक्तींची ये-जा वाढली असून काही विद्यार्थी अनधिकृतरीत्या शाळेबाहेर गेल्याच्या घटनांनी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकांनी तातडीने मजबूत कंपाउंड वॉल उभारण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी धोबीघाटाची सुविधा नसल्याने स्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वसतिगृह व शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब असून पाणीपुरवठा व नियमित देखभाल नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच वसतिगृहांच्या इमारतींची दुरवस्था व आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.याशिवाय, शाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. उपलब्ध मोकळ्या जागेचा योग्य वापर न झाल्याने विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासावरही मर्यादा येत आहेत. विविध खेळांसाठी स्वतंत्र मैदाने विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, वाढत्या वीज खर्चाच्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवून शाळेला ऊर्जा स्वावलंबी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. सर्व इमारतींवर सोलर सिस्टीम बसवून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास पुढील स्तरावर पाठपुरावा करण्याचा इशारा पालकांनी दिला असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सुद्धा या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत. तसेच वरिष्ठ पातळीवरून या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी पालकांना सांगितले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button