अंमली पदार्थ वाहतूक व विक्री प्रकरणी तीन आरोपी अटकेत, पालघर पोलिसांची मोठी कारवाई; १४३ किलो डोडा पावडर जप्त

पालघर :

पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाया करण्याच्या धोरणानुसार पालघर पोलीस दलाने मोठी धडक कारवाई करत अंमली पदार्थाची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १४३.५१ किलो वजनाचा, २१ लाख ५२ हजार ६७५ रुपये किमतीचा डोडा पावडर व अफुजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी अंमली पदार्थ विरोधात कठोर कारवाईच्या सूचना दिल्या असून त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व कासा पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे सोमटा गावातील इसम महेंद्र काशीनाथ गुरोडा याच्या घराशेजारील खोलीवर छापा टाकण्यात आला.

छाप्यात प्रतिबंधित अफुची सुकलेली बोंडे व त्यापासून तयार केलेली डोडा पावडर मोठ्या प्रमाणात सापडली. या प्रकरणी महेंद्र काशीनाथ गुरोडा (रा. सोमटा), सुनील बियाराम बिष्णोई (रा. सोमटा), बाबूलाल शिवशंकर यादव (रा. नालासोपारा) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

कासा पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक १७/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ मधील कलम ८ (क), १८ (ब), २५ व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना मा. न्यायालयाने ०७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोनि. अमर पाटील, कासा पोलीस ठाणे करीत असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button