पालघर :
पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजाची अवैध साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. या कारवाईत २.९६५ किलो वजनाचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाया करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून त्या अनुषंगाने तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, अमगाव चौकी हद्दीतील मौजे संभा येथील इराणी फार्म वाडी येथे गांजा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात फिकट तपकिरी रंगाचे पाने, फुले, काड्या व बिया असलेला, उग्र वास असलेला कोरडा गांजा सदृश्य वनस्पती पदार्थ आढळून आला. सदर मुद्देमालाचे वजन २.९६५ किलो असून तो कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक २८/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २०(ब) अंतर्गत दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात
मोहम्मद चंगेज हाजी अब्दुल रौफ शेख ऊर्फ मोईनुदीन रौफ शेख (वय ३६, रा. संजाण, ता. उंबरगाव, जि. बलसाड), अतिश गणेश कुमरे (वय २८, रा. उंबरगाव, जि. बलसाड) यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. अमोल चिंधे, तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
