बोईसरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी आरोपी अटक; विहिंप नेते मुकेश दुबे यांची दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी बोईसर पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी रियाज शेख याच्याविरुद्ध अत्याचार व पॉक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने इन्स्टाग्रामवर मैत्री करून प्रेम व विवाहाचे आमिष दाखवत विद्यार्थिनीशी संपर्क वाढवला. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पीडितेने बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.

विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री चंदन सिंह यांनी अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या आमिषाने फसवून त्यांचे शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर विहिंपचे नेते मुकेश दुबे यांनी या प्रकरणाला “लव्ह जिहाद” असे संबोधत दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी जयेश घरत, काचू शेट्टी, दीपेश दांडेकर, आकाश नारखेडे, प्रभात ठाकूर, विजय शेट्टी, सागर शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बोईसरचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांनी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देत प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात अलीकडेच समोर आलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button