वाडा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत हरित उपक्रमांना चालना देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाडा तालुक्यातील सर्व शाखांच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने वाडा तालुक्यात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “प्रति कर्मचारी एक झाड” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात बँकेच्या विविध शाखांतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
बँकेच्या वाडा तालुक्यातील वाडा, कुडूस, कंचाड, खानिवली आणि शिरीषपाडा या पाच शाखांमधील सुमारे १२० कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. विशेष बाब म्हणजे, वृक्षारोपणासाठी लागणारा खर्च कर्मचाऱ्यांनी स्वतः उचलला असून त्यांनी सुमारे २०० वृक्षांची लागवड केली आहे. केवळ वृक्ष लागवड करून थांबण्याऐवजी या वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांनी स्वीकारली आहे.वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरण संरक्षणाची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून हा उपक्रम राबविला. वृक्षारोपणामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून भविष्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे यांनी वृक्षारोपणासोबत वृक्षांचे संगोपन आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया संजय गांधी नॅशनल पार्कचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी व्यक्त करून सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
बँकेच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी , वाडा पश्चिमचे वनरक्षक भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत पष्टे, वाडा शाखेच्या व्यवस्थापक मयुरी पाटील, भिवंडी तपासणीस सुभाष पाटील यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
