आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा वॉटर सर्फिंगचा रोमांचक अनुभव; वसई किनाऱ्यावर उत्साहाची लाट

पालघर, दि. ९ एप्रिल : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी वसई समुद्रकिनारी वॉटर सर्फिंगचा थरारक अनुभव घेतला. डहाणूचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आणि Mumbai Surf Club and School यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. प्रथमच वॉटर सर्फिंगसारख्या जलक्रीडा प्रकाराचा अनुभव घेताना सुरुवातीला काहींना भीती वाटली, मात्र प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेतला. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह प्रत्यक्ष सर्फिंगची संधी देण्यात आली.

या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आणि त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी प्रोत्साहित करणे हा आहे. अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीतून आलेले असल्याने अशा संधी त्यांच्या आयुष्यात नवे दालन उघडणाऱ्या ठरत आहेत.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह आणि समाधान पाहण्यासारखे होते.“हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता. सुरुवातीला भीती वाटली, पण नंतर खूप मजा आली,” असे रोशन हरपाले याने सांगितले. तर “या उपक्रमामुळे आत्मविश्वास वाढला,” असे नंदिनी चव्हाण यांनी सांगितले.

प्रशिक्षक प्रीती रावत यांनी सांगितले की, सुरुवातीला घाबरणारी मुले नंतर धाडसाने सर्फिंग करताना पाहणे हा अत्यंत भावनिक क्षण होता. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख देणारा ठरल्याचे मत विशाल खत्री यांनी व्यक्त केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button