14 किमीची जीवनवाहिनी नाल्यात रूपांतरित,
बचाव समिती सध्या काय करते? मरण पावलेली नदी आणि जिवंत असलेले अपराधी
पालघर : मंगेश तावडे
पालघर तालुक्यातील वरखुंटी – कमारे येथून उगम पावणारी आणि महिकावती खाडीत मिसळणारी पाणेरी नदी आज पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. अवघ्या 14 ते 16 किलोमीटर अंतराची ही नदी औद्योगिक सांडपाणी, मलनिस्सारण, कचरा आणि अतिक्रमणामुळे अक्षरशः नाल्यात रूपांतरित झाली आहे. नदीचे पाणी काळवंडले असून तीव्र दुर्गंधीमुळे परिसरात राहणेही कठीण झाले आहे. पालघर माहीम हमरस्त्यावरील हे विदारक दृश्य पाहून मनाला खरोखरच वेदना होतात. त्याकडे सध्या कुणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते.

या गंभीर स्थितीत पाणेरी नदी बचाव समिती केवळ कागदावरच सक्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रदूषण करणार्या घटकांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसून प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासनाची उदासीनता उघड झाली आहे. नदी थेट महिकावती खाडीत मिळत असल्याने मासेमारी, जैवविविधता व स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. पाणेरी नदी वाचवण्यासाठी तातडीच्या कठोर उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.

पालघर तालुक्यातील (पालघर माहीम रोड) पाणेरी नदी आज केवळ प्रदूषित नाही, तर ती प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे जाणीवपूर्वक मारली जात आहे. वरखुंटी आणि कमारे परिसरातून उगम पावणारी, अवघ्या 14 किलोमीटरचा प्रवास करून महिकावती खाडीत मिळणारी ही नदी आज नाल्यापेक्षाही भयावह अवस्थेत पोहोचली आहे. ही स्थिती अचानक उद्भवलेली नाही, तर वर्षानुवर्षे चाललेल्या दुर्लक्ष, राजकीय सोयीस्कर गप्पी आणि तथाकथित ‘बचाव समित्यांच्या’ अपयशाचा हा परिणाम आहे.
नदी ही केवळ पाण्याची वाहिनी नसते; ती परिसराची जीवनवाहिनी असते. शेती, आरोग्य, पर्यावरण, जैवविविधता आणि स्थानिक अर्थकारण या सार्यांचा नदीशी थेट संबंध असतो.
मात्र, पाणेरी नदीच्या बाबतीत ही मूलभूत जाणीवच हरवलेली दिसते. औद्योगिक सांडपाणी, रसायने, मलनिस्सारण, घनकचरा आणि अतिक्रमण यांना वर्षानुवर्षे मोकळे रान दिले गेले. परिणामी नदीचा नैसर्गिक प्रवाह थांबला, पाणी विषारी झाले आणि नदीकाठचा परिसर राहण्यालायक राहिला नाही.
या पार्श्वभूमीवर पाणेरी नदी बचाव समितीचे अस्तित्व हा गंभीर प्रश्न ठरतो. बचाव समिती नेमकी काय करते? केवळ निवेदने आणि अहवाल यालाच ‘कार्य’ म्हणायचे का? जर नदी आजही मृतप्राय अवस्थेत असेल, तर बचाव कुणाचा आणि कशाचा झाला? याचा आता जाहीर हिशेब मागितला पाहिजे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायती यांची भूमिका तितकीच चिंताजनक आहे. प्रत्येक विभागाकडे अधिकार आहेत, पण जबाबदारी मात्र कुणालाच नको. ‘फाईल पुढे पाठवली’, ‘अहवाल येणे बाकी आहे’, ‘कारवाई प्रक्रियेत आहे’ ही उत्तरे वर्षानुवर्षे ऐकून पाणेरी नदी मात्र गाळात गाडली जात आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेला केवळ अपयश म्हणणे पुरेसे नाही; ती थेट गुन्हेगारी दुर्लक्ष आहे.
या प्रदूषणाचे परिणाम केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नाहीत. नदीकाठावरील शेतजमिनी नापीक होत आहेत, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्वचारोग आणि श्वसनविकार वाढत आहेत. तरीही आरोग्य यंत्रणा शांत आहे. नदी थेट महिकावती खाडीत मिळत असल्याने खाडीतील मासेमारी, जैवविविधता आणि कोळी-आदिवासी समाजाचे अर्थकारण उद्ध्वस्त होत आहे.
हा प्रश्न संपूर्ण किनारपट्टीच्या पर्यावरणाशी जोडलेला आहे, हे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्षित केले आहे.
पर्यावरण दिन, नदी स्वच्छता अभियान, जलसंवर्धन सप्ताह यावेळी मोठ्या थाटामाटात कार्यक्रम होतात. भाषणे, फलक, जाहिराती होतात. पण प्रत्यक्ष कृती कुठे आहे? पाणेरी नदीसाठी कोणती ठोस योजना, कोणती अंतिम मुदत आणि कोणती जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे? की पुन्हा एखादी समिती स्थापन करून विषय थंड बस्त्यात टाकला जाणार आहे? आज प्रश्न असा आहे की नदी पूर्णपणे नाहीशी झाल्यावर प्रशासन जागे होणार का? भविष्यात ‘एकेकाळी येथे पाणेरी नदी वाहायची’ असे फलक लावून आपली जबाबदारी संपली असे समजायचे का?
नदी मरते, पण तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे मात्र सुरक्षित राहतात-हीच खरी शोकांतिका आहे. पाणेरी नदीचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर प्रशासनाच्या नैतिकतेचा आणि कार्यक्षमतेचा आरसा आहे. तातडीने प्रदूषण करणार्या घटकांवर कठोर कारवाई, अतिक्रमण निर्मूलन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणे आणि स्वतंत्र चौकशी ही काळाची गरज आहे. अन्यथा पाणेरी नदीचा मृत्यू हा निसर्गाचा नव्हे, तर माणसाच्या अपयशाचा स्मारक ठरेल.
Contact No. 77219947798
