वाडा-भिवंडी महामार्गावर भीषण अपघात; युवक गंभीर जखमी

वाडा : राजतंत्र वृत्तसेवा

वाडा-भिवंडी महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बावली (ता. वाडा) येथील आकाश दोडे हे गंभीर जखमी झाले. संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला असून, अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. रस्त्यावर इशारा फलक, रिफ्लेक्टर, प्रकाश व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणाची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातावेळी कामगार घटनास्थळी उपस्थित होते. मात्र जखमींना मदत करण्याऐवजी त्यांनी काम बंद करून तेथून निघून गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमी आकाश दोडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, वाडा-भिवंडी महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे आणि सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग “मृत्यूचा सापळा” बनत चालल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ते कामांच्या ठिकाणी कठोर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button