दापोली / पालघर: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे बुधवारी कोकण विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व ‘आत्मा’ (ATMA) योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत शेतकऱ्यांना प्रशिक्षणासोबत अभ्यास दौऱ्याचेही नियोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि वसई तालुक्यांमधील प्रेरक व नैसर्गिक शेती करणारे सुमारे ८० शेतकरी सहभागी झाले होते. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी विभागाचे अधिकारी, ‘आत्मा’चे संचालक तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम पत्रिकेनुसार विविध सत्रांमध्ये नैसर्गिक शेतीची तत्त्वे, सेंद्रिय पद्धती, पीक व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर, तसेच शेतीतील खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचे उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी या तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेमुळे उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले असून, या पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात नैसर्गिक शेतीविषयक ‘शेतीशाळा’ मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा प्रसार होण्यास चालना मिळणार असून, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे.
