माझी आई राधा विलीन चौधरी संघर्षाची जिवंत ओळख!

माझी आई राधा विलीन चौधरी एक शिवसैनिक, संघर्षाची जिवंत ओळख. तिच्या आयुष्यातील राजकीय प्रवास हा कधीच सोपा नव्हता. अनेक वेळा संधी दारात येऊनही परत गेल्या, कधी उमेदवारी नाकारली गेली, तर कधी मेहनतीचे योग्य मूल्यमापन झाले नाही. पण या प्रत्येक अपयशाने तिला खचवले नाही, उलट अधिक मजबूत बनवले. ती आज ज्या ठामपणे स्वतःच्या पायावर उभी आहे, ते पाहून मुलगा म्हणून माझ्या मनात अभिमानाची एक वेगळीच भावना दाटून येते. तिच्या डोळ्यातील जिद्द, चेहर्‍यावरची शांत ताकद आणि मनातील शिवसैनिकाची निष्ठा मला नेहमी प्रेरणा देते. आज तिचा वाढदिवस, त्याचबरोबर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन-हा खरोखरच त्रिवेणी संगम आहे. या खास दिवशी माझ्या मम्मीला आयुष्यभर आनंद, आरोग्य आणि यश लाभो, हीच मनापासून प्रार्थना. 1998 पासून पूज्य Shri Mataji Nirmala Devi यांच्या कृपाछत्राखाली सहज योग ध्यानाचा प्रवास सुरू आहे. या साधनेमुळे मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढली. जीवनातील ताणतणाव कमी होऊन अंतर्मन स्थिर झाले, याचा निश्चितच अमूल्य फायदा झाला आहे.
– तुझाच मुलगा मयूर

संघर्षातून घडलेली जिद्द, समाजसेवेची अखंड ओढ, कमला पार्क परिसराची आधारस्तंभ कार्यकर्ती, निष्ठा आणि समर्पणाची ओळख, प्रत्येक संकटावर मात करणारे धैर्य, जनतेसाठी सदैव तत्पर असलेले नेतृत्व, महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणारी प्रेरणा, कर्तृत्व आणि सेवाभावाचा सुंदर संगम, लोकांच्या विश्वासाची खरी पात्र असणारी माझी मम्मी सौ. राधा विलीन चौधरी.
आईचे माहेर म्हणजेच माझ्या मामाचे गाव पिंपळास, तालुका वाडा. आईचे साधं दहावीपर्यंत शिक्षण, पण आयुष्याने मात्र खूप मोठं शिक्षण दिलं. 1993 साली कंचाड येथे लग्न होऊन आली आणि नव्या आयुष्याची सुरुवात झाली. पप्पा विलीन गजानन चौधरी यांच्यासोबत संसार थाटताना संघर्ष हा आमचा कायमचा सोबती होता. चरितार्थ चालवण्यासाठी आम्ही पालघर शहर गाठलं. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण हार मानली नाही. पप्पांनी मुंबईत एअर इंडियाच्या खासगी कार्यालयात नोकरी केली. त्या काळात घर, नोकरी आणि माझे संगोपन या सगळ्यांचा ताळमेळ साधताना खूप कष्ट घ्यावे लागले.


आईचं सर्वात मोठं स्वप्न होतं – मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं. त्या स्वप्नासाठी या दोघांनीही खूप त्याग केला. आज मी इंजिनियर आहे आणि माझी पत्नी डॉक्टर आहे, हे पाहताना मम्मीच्या आयुष्यभराच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. हे सगळं पाहून मन भरून येतं. कारण या यशामागे आमच्या सर्वांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि संयमाची कहाणी दडलेली आहे.
राजकारणात येणं हे मम्मीच्या आयुष्यातील एक वेगळं वळण होतं. कंचाड येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब आले होते, त्यावेळी त्यांचं स्वागत करण्याचं भाग्य तिला मिळालं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने ती खूप प्रभावित झाली होती. त्यांच्या प्रेरणेतूनच पालघर शहरात शिवसेनेचं काम सुरू केलं. त्यानंतर गणेश नाईक यांच्या उपस्थितीत वाडा येथे झालेल्या मोठ्या मेळाव्याने पक्षाशी बांधिलकी अधिकच घट्ट झाली.


गेली अनेक वर्षे मम्मी पालघरच्या कमला पार्क परिसरात पक्षासाठी काम करत राहिली. आंदोलन असो, कार्यक्रम असो किंवा प्रचार – प्रसार कधीही वेळ, परिस्थिती तिने पाहिली नाही. पक्षासाठी पूर्ण निष्ठेने काम केलं. अनेक वेळा नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळालं, पण स्वतःसाठी काही मागितलं नाही. जेव्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मात्र कधीही संधी मिळाली नाही. अनेक वेळा उमेदवारी मागे घ्यावी लागली. त्या वेळी मनात खूप वेदना झाल्या. तरीही तिने पक्षाशी निष्ठा ठेवली. नाराज होऊनही कधीच पाठ फिरवली नाही.


2025 च्या नगरपालिका निवडणुकीत मात्र परिस्थिती वेगळी होती. स्वपक्षाने उमेदवारी नाकारली. त्या वेळी मन खूप दुखावलं गेलं. पण बंडखोरी न करता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली. कमला पार्क येथून निवडणूक लढवली. अनेक वर्षांच्या कामानंतरही अपमान सहन करावा लागला, ही खंत मनात होती. निवडणुकीत अपयश आलं, पण त्या अनुभवाने खूप काही शिकवलं, असे ती म्हणते. एक निवडणूक लढवणं म्हणजे काय? जनतेसमोर उभं राहणं म्हणजे काय? याची खरी जाणीव झाली.


मम्मीच्या सामाजिक कामाचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. 2022-23 साली शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून मला बचतगट सहयोगिनी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात शेकडो बचतगट उभे केले. महिलांना एकत्र आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्ज मिळवून देणं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं धैर्य देणं – हे तिच्यासाठी खूप समाधान देणारं काम होतं.
आजही मम्मी बचतगटांच्या माध्यमातून रास्त दराच्या धान्य दुकानातून सेवा देत आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची भावना कायम मनात आहे. 2014 साली स्वच्छ भारत अभियानांतर्गत पेसा माध्यमातून मार्गदर्शन करण्याची संधीही मिळाली. गाव स्वच्छ, सुंदर आणि सुजाण व्हावं, यासाठी प्रयत्न केले. आई म्हणते, माझ्या आयुष्यात खूप चढ-उतार आले, कधी सन्मान मिळाला तर कधी अपमान सहन करावा लागला. पण एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे काम करण्याची जिद्द. आज मागे वळून पाहताना वाटतं, प्रत्येक संघर्षाने मला अधिक मजबूत केलं. आई म्हणते, मी आजही तितक्याच उत्साहाने समाजासाठी काम करत आहे. पद मिळालं किंवा नाही, मान-सन्मान मिळाला किंवा नाही – पण लोकांच्या चेहर्‍यावर हसू आणता आलं, तर तेच माझ्यासाठी खरं यश आहे. माझा प्रवास अजून संपलेला नाही तो अजूनही सुरू आहे, नव्या उमेदीने, नव्या स्वप्नांसह…

मम्मीचा स्वभाव अनेकांना तापट वाटतो, पण खरं तर तो तिच्या प्रामाणिकपणाचा भाग आहे. तिला खोटं अजिबात सहन होत नाही, म्हणूनच कधी कधी ती चिडलेली दिसते. पण तिच्या मनात मात्र अपार माया आणि आपुलकी दडलेली आहे. तिच्या प्रत्येक शब्दात खरं प्रेम असतं, फक्त ते ओळखायला हवं. जिथे जाईल तिथे ती त्या माणसांची, त्या परिसराची होऊन जाते. तिच्या स्वभावात एक वेगळीच उब आहे, जी प्रत्येकाला जोडून ठेवते. खरंच, मम्मीचा स्वभाव समजून घेतला तर तो अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button