वाडा : रुपेश मोकाशी
वाडा तालुक्यातील बिलोशी गावातील साहारा फोम या फोम उत्पादन करणाऱ्या कंपनीला रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलोशी गावाच्या हद्दीत असलेल्या या कंपनीत पहाटे अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात फोम व इतर ज्वलनशील पदार्थ साठवलेले असल्याने आगीने काही वेळातच भीषण स्वरूप धारण केले. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, ज्वलनशील साहित्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अखेर काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
दरम्यान, या आगीत कंपनीचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीची नोंद झाली आहे. घटनेचा अधिक तपास वाडा पोलीस करीत आहेत.
