वाडा : राजतंत्र वृत्तसेवा
वाडा तालुक्यातील आबिटघर गावच्या हद्दीत असलेल्या विस्तार मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एसी दुरुस्तीचे काम सुरू असताना झालेल्या भीषण स्फोटात तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवार (दि. 27) रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या परिसरातील सर्वे क्रमांक १५४ ते १६५ या भागात एसी दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान एसीच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की त्यातून निर्माण झालेल्या आगीच्या लाटांनी कामगारांना वेढले. या आगीत तीन कामगार गंभीररीत्या भाजले गेले.
जखमी कामगारांना तातडीने वाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिघांनाही मृत घोषित केले. या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे मोहम्मद अली अन्सारी (वय ३२), अखिलेश कुमार मोतीलाल जैस्वाल (वय ४५) आणि किसन भिवा निकम (वय ५७) अशी आहेत.
या घटनेनंतर कंपनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे अधिक तपास करत आहेत. दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडूनही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
