पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय महाअधिवेशन व महिला महाअधिवेशन मध्यप्रदेशातील जबलपूर येथे ४ व ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. दाऊ मॅरेज गार्डन, महाराजपूर येथे होणाऱ्या या दोन दिवसीय अधिवेशनात देशभरातील समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या महाअधिवेशनात केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात कुर्मी समाजातील विविध घटकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार असून पटेल, पाटील, पाटीदार, मराठा, कुनबी, कलबी, कुडुंबर, कूर्मि, देवेंद्र कुल वेल्लालर, महतो, गुर्जर, खंडायत, नायक, नायडू, कापू, चंद्राकार, अंजना समाज, कम्मा, ओक्का लिंगा, कुलमी आदी समाजांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
अधिवेशनात शेती व शेतकरी प्रश्न, युवा विकास, महिला सक्षमीकरण, उद्योग व रोजगार तसेच समाजाची विविध क्षेत्रांतील भागीदारी वाढविणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. यासोबतच विविध ठराव मंजूर करून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिशा ठरवली जाणार आहे.
या प्रसंगी कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल. पी. पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वी. एस. निरंजन, राष्ट्रीय महासचिव उमेश कुमार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा लताऋषी चंद्राकर, युवा अध्यक्ष धीरज पाटीदार तसेच उद्योग महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वर्मा मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी होणार असून प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, महासचिव जयेश शेलार पाटील, कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील, युवा अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. शोभाताई गायकवाड, उद्योग महासभेचे प्रदेश अध्यक्ष समीर पाटील तसेच विद्यार्थी महासभेच्या प्रदेश अध्यक्षा कु. निकिता पाटील उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, कोकण प्रांताध्यक्ष विजय दलवी, कृषिभूषण भगवान रामजी इंगोले यांच्यासह सुमारे १०० पदाधिकारी व प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. तसेच, माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. बाबूलाल सिंह यांच्या स्मरणार्थ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
