पालघर (मंगेश तावडे)
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर पालघर नगरपरिषदेतील लोकमान्य नगर नवली उड्डाणपुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची ठोस आणि जोरदार मागणी करण्यात आली आहे. शिवसैनिक तथा माजी नगरसेवक शशिकांत किणी यांनी या संदर्भात लोकनियुक्त नगराध्यक्ष उत्तम घरत यांना अधिकृत निवेदन सादर करत आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत हा विषय मंजुरीसाठी घेण्याची मागणी सुद्धा केली आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. शिवसेनेचे संस्थापक, निर्भीड व्यंगचित्रकार, मराठी माणसाचा बुलंद आवाज आणि हिंदुत्वाची ठाम भूमिका मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेतून महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, हा विश्वास त्यांनी जनतेच्या मनात रोवला. अशा महान नेत्याच्या स्मृती जपण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी त्यांचे नाव देणे ही काळाची गरज असल्याचे मत शिवसैनिकांच्या वतीने श्री. किणी यांनी व्यक्त केली आहे.
पालघर शहरातील लोकमान्य नगर नवली उड्डाणपूल हा एक महत्वाचा वर्दळीचा मार्ग असून या पुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यास तो केवळ नावफलक न राहता प्रेरणास्थान ठरेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगरपरिषदेने यावर ठराव करून तो शासनाकडे पाठवून तातडीने पाठपुरावा करावा, अशी ठाम भूमिका शशिकांत किणी यांनी मांडली आहे.
या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे, गटनेत्या डॉ. उज्वला काळे आणि शहर प्रमुख राहुल घरत यांनाही प्रत पाठवण्यात आली आहे. शिवसैनिकांमध्ये या विषयावर सकारात्मक वातावरण असून नगरपरिषदेने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
माजी नगरसेवक शशिकांत किणी हे भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नगर परिषद निवडणुकीत सहभागी झाले आहेत. त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने या नवली पुलाला देण्यात यावे, असेही श्री. किणी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
