सोन्याचे दागिने पॉलिशच्या बहाण्याने लंपास करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक

बोईसर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पालघर : 

पालघर जिल्ह्यात सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून एका ज्येष्ठ महिलेला गंडा घालणाऱ्या दोन सराईत आरोपींना बोईसर पोलिसांनी अटक करत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून तब्बल ४५.३२० ग्रॅम वजनाचे, सुमारे ३.५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी श्रीमती हंसीदेवी कुंदनसिंह रौतेला (वय ७३), रा. भक्तीयोग को-ऑप. हौसिंग सोसायटी, डिजेनगर, बोईसर या मकर संक्रांत निमित्त बोईसर भाजीमार्केटमध्ये खरेदी करून यशपद्म इमारत परिसरात, आयसीआयसीआय बँकेजवळ थांबल्या असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी गप्पा मारत विश्वास संपादन केला. “सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो” असे सांगत त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील चार सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने काढून घेतल्या.

त्यानंतर आरोपींनी पांढऱ्या रुमालात वह्यांचे कागद बांधून त्यात दागिने असल्याचा बनाव करत फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी

धिरज उर्फ पापा राजाराम राठोड (वय ४०), दिनेश हिरालाल सोलंकी (वय ४२) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्यांच्याकडून गुन्ह्यातील सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपी धिरज राठोड हा मुंबई व नवी मुंबई परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी दिनेश सोलंकी याच्यावरही फसवणुकीचा गुन्हा नोंदवलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके करत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली बोईसर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button