“फसवणूक, अत्याचार आणि सोशल मीडियाच्या जाळ्यातून सावध राहा!” पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांचे आवाहन

पालघर : पालघर जिल्ह्यात महिलांवरील फसवणूक आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या सलग घटनांमुळे खळबळ उडाली असून नागरिकांनी नव्या ओळखी आणि सोशल मीडियावरील संबंधांबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. अशा घटनांबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यास अजिबात घाबरू नये, तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

पालघर तालुक्यात महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणाऱ्या चार वेगवेगळ्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून महिलांची आर्थिक व शारीरिक फसवणूक तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या या गंभीर प्रकरणांमध्ये पालघर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

मंदिरात बनावट लग्नाचा बनाव; २९ वर्षीय महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक : पहिली घटना पालघर तालुक्यातील केळवे परिसरातील आहे. येथे २९ वर्षीय हिंदू महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर मंदिरात खोटे लग्न लावल्याचा बनाव करून तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याचबरोबर विविध कारणे सांगत आरोपीने पीडितेकडून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत पुण्यातून त्याला अटक केली.

तीन स्वतंत्र घटनांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार; पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल : उर्वरित तीन घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या तिन्ही प्रकरणांतील पीडित मुली १८ वर्षांखालील असून आरोपींनी वेगवेगळ्या प्रलोभनांनी त्यांना जाळ्यात ओढून अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पीडितांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हे दाखल करत आरोपींवर बलात्कार आणि पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावली आहेत. तिन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून तपास सुरू आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button