एटीएम कार्ड बदलून ५० हजारांची फसवणूक

पेल्हार पोलिसांची झटपट कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

२४ तासांत गुन्हा उघड; वॅगनार कार जप्त, ४० हजार रुपये हस्तगत

पालघर : मंगेश तावडे

एटीएममधील ग्राहकांना बोलण्यात गुंतवून हातचालाखीने एटीएम कार्ड बदलून बँक खात्यातून रोख रक्कम काढणाऱ्या टोळीतील एका आरोपीला वसई तालुक्यातील पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.

या कारवाईत ५० हजार रुपयांच्या फसवणुकीपैकी ४० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी कारही जप्त करण्यात आली आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास रमाशंकर देवकीनंदन तिवारी (वय ५३, रा. नालासोपारा पूर्व) हे वसई फाटा येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएममध्ये आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून “तुमचे ट्रान्झॅक्शन सक्सेस झाले नाही,” असे सांगितले. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी हातचालाखीने फिर्यादींचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांना कॅनरा बँकेचे दुसरेच एटीएम कार्ड देऊन तेथून पसार झाले.

यानंतर आरोपींनी दुसऱ्या एटीएममधून फिर्यादीच्या बँक खात्यातून ५०,००० रुपये रोख काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या घटनेबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून पेल्हार पोलीस ठाण्यात दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा रजि. नं. ७३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हा नोंद होताच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींनी मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार कार वापरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन मालकाची माहिती मिळवून कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला. त्यानुसार मोहम्मद अफजल मोहम्मद असलम (वय २५, रा. उलवे, नवी मुंबई) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून ४०,००० रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली वॅगनार कार जप्त करण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणण्यात पेल्हार पोलिसांना यश आले असून, उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपीस २७ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक शकील शेख तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पार पाडली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button