परदेशी नागरिकांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद, ५ आरोपी अटकेत
पालघर : मंगेश तावडे
पालघर पोलीस यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आणत बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. पालघर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माहिम, पालघर पश्चिम येथील एका रहिवासी इमारतीमध्ये अनधिकृत बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.१० वाजता फिया एकांत बिल्डिंग, रूम क्रमांक ३०३ येथे छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान फ्लॅटमध्ये पाच आरोपी आढळून आले. झडतीमध्ये सुमारे ५ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ४ लॅपटॉप, १२ मोबाईल फोन, ४ हेडफोन, एक राऊटर व एक डोंगल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ठाणे, पुणे, गुजरात व पंजाब येथील रहिवाशांचा समावेश आहे.
तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी अमेरिकेतील नागरिकांचे मोबाईल क्रमांक व वैयक्तिक माहिती बेकायदेशीररित्या संकलित करून स्वतःला मायक्रोसॉफ्ट किंवा अॅपल कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ओळख देत होते. “तुमच्या डिव्हाईसमध्ये व्हायरस आहे” अशी बतावणी करून नागरिकांना गिफ्ट कार्ड खरेदीस भाग पाडले जात होते. ही रक्कम नंतर डिजिटल चलनात रूपांतरित करून हवालामार्गे रोख स्वरूपात घेतली जात होती.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात बी.एन.एस. कायदा २०२३ व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, पालघर करीत आहे.
अटक करण्यात आलेल्या भरत लोकु लालवानी (वय ३५ वर्षे, रा ई/२६०५, एमआयसीएल बिल्डींग, ठाकुर मॉल जवळ, मिरारोड पुर्व जि ठाणे), रोहीत राजेंद्र निंबाळकर (वय २९ वर्षे, पत्ताः प्लॉट नं ८/९ कुंजीरवाडी, स्वामी भवन बिल्डींग, नायगाव, ता हवेली, जि पुणे), रोहीत मिलींद झोऱ्हे (वय २३ वर्षे, रा. बिल्डींग नंबर ०४ प्लॅट नंबर १०१, वासुदेव पॅराडाईज, लक्ष्मीपार्क मिरारोड ता.जि. ठाणे), अमरदीप अंग्रेज गिल (वय २४ रा. रुम नंबर बी/४०४ न्यू साई चरण दर्शन बिल्डींग भाईदंर पूर्व ता.जि. ठाणे मुळ रा. मोहाली, अमृतसर पंजाब राज्य.), सागर बलदेव पाठडिया (वय २९ वर्षे, रा. प्लॅट नंबर १०१ ओ विंग श्रीपाद रेसिडेन्सी, कामरेज, सुरत, राज्य गुजरात.) यांचा समावेश आहे.
