पालघर जिल्ह्यातील भाजपला बळकटीकरण
Palghar : Mangesh Tawade
पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीसाठी अभिमानाची बाब ठरावी अशी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून, भाजपचे ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते संतोष शिवराम जनाठे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्षांनी उपाध्यक्ष, सरचिटणीस, महिला मोर्चा तसेच इतर विविध महत्त्वाच्या पदांवर खासदार व आमदारांची निवड केली असून, त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील तळागाळातून पक्ष वाढविणाऱ्या कार्यकर्त्याला प्रदेश पातळीवर संधी देण्यात आल्याने जिल्हा भाजपला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले श्री. जनाठे यांनी अनेक वर्षे विस्तारक म्हणून काम करत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली असून लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार म्हणून त्यांच्या नावालाही पसंती होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी डॉ. हेमंत सावरा यांच्या नावाला संधी दिली. तरीही नाराजी न ठेवता श्री. जनाठे यांनी पक्षाच्या कामात पूर्ण ताकदीने योगदान देत उमेदवाराच्या विजयासाठी मोलाचे सहकार्य केले.
पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी उभारलेल्या ‘बिरसायत’ संस्थेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांतून अनेक तरुणांना दिशा मिळाली असून काहींना नोकरी तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. श्री. जनाठे यांच्या नियुक्तीमुळे पालघर जिल्हा भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
