पालघर : राहुल ठाकूर
आषाढ महिन्याची चाहूल लागताच अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीने भारावून जातो. टाळ-मृदुंगाच्या निनादात, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल”च्या अखंड गजरात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीचे आकर्षण यंदा पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही लाभले. पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत त्यांनी उत्साहाने वारीत सहभाग नोंदविला.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. याच भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पालघर जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यंदा वारीत सहभागी होण्याचा संकल्प केला.
गंधाचा टिळा, पांढरा पारंपरिक पेहराव, डोक्यावर गांधी टोपी आणि गळ्यात भजनी टाळ अशी वारकरी वेशभूषा करून त्यांनी वारीचा आनंद लुटला. फलटण ते भरड या सुमारे २५ किलोमीटरच्या पदयात्रेत सहभागी होत त्यांनी वारकरी परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
ही संकल्पना साकार करण्यामध्ये नागेश्वर संखे (प्राचार्य, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, डहाणू), राहुल पागधरे (वरिष्ठ सहाय्यक, ग्रामपंचायत विभाग), रविंद्र खेडकर (ग्रामपंचायत अधिकारी), राहुल ठाकूर (तालुका व्यवस्थापक, पेसा कक्ष, ग्रामपंचायत विभाग) आणि विकास पाटील (जिल्हा व्यवस्थापक, पेसा कक्ष, ग्रामपंचायत विभाग) यांनी पुढाकार घेतला.
वारीदरम्यान विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि वारकऱ्यांमधील समता, सेवा व भक्तीभावाचा अनुभव घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. समाजात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
