नातेवाईकांची तब्बल १० वर्षांनंतर भावनिक भेट, 

बेपत्ता व्यक्तीचा शोध; पालघर पोलीसांची यशस्वी कामगिरी

पालघर : मंगेश तावडे

पालघर पोलीस दलाने तब्बल १० वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात मोठे यश मिळवले आहे. सन २०१६ साली वाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मनुष्य मिसिंग प्रकरणाचा छडा लावत हरवलेल्या व्यक्तीची त्यांच्या कुटुंबीयांशी तब्बल दहा वर्षांनंतर भेट घडवून आणण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.

सन २०१६ मध्ये वाडा पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक २०/२०१६ दाखल करण्यात आला होता. यामध्ये प्रवीण गोपीनाथ पवार (वय ३९), रा. पवारवस्ती, शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर हे विक्रमगड येथे हॉस्पिटलमध्ये कामानिमित्त आले असताना घरच्यांशी वाद झाल्याने रागाच्या भरात कोणालाही काहीही न सांगता घर सोडून निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी कोणताही संपर्क ठेवलेला नव्हता. अनेक वर्षे शोध घेऊनही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागत नव्हता.

पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन मुस्कान-१४” अंतर्गत हरवलेली मुले, महिला तसेच मनुष्य मिसिंग प्रकरणांचा नव्याने सखोल तपास सुरू करण्यात आला. याच मोहिमेअंतर्गत वाडा पोलीस ठाण्याचे पोउपनि/वनवे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कसून तपासाच्या आधारे प्रवीण पवार हे दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न केले.

त्यानंतर खात्री करून सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या नातेवाईकांची तब्बल १० वर्षांनंतर भावनिक भेट घडवून आणण्यात आली. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी यतिश देशमुख (पोलीस अधीक्षक, पालघर), विनायक नरळे (अपर पोलीस अधीक्षक), समीर मेहेर (उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोनि/दत्तात्रय किंद्रे (प्रभारी अधिकारी, वाडा पोलीस ठाणे), पोउपनि/वनवे व वाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कुशलतेने पार पाडली आहे. पालघर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे आणि ऑपरेशन मुस्कानच्या यशाचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button