पालघर : जिल्ह्यात बुधवारी पहाटे मान्सूनचे जोरदार आगमन झाले. पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. विशेषतः पालघर शहरात अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी कोसळल्या. मात्र पावसासोबतच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
पहाटे वीज अचानक गायब झाल्याने अनेक नागरिकांची झोपमोड झाली. त्यातच मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी 5.11 वाजताच्या पहिल्या रेल्वे गाडीने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली. वीज नसल्याने अंधारात तयारी करावी लागली, तर काहींना छत्री किंवा रेनकोटची व्यवस्था न झाल्याने भिजतच रेल्वे स्थानकाच्या दिशेने धाव घ्यावी लागली.
सुमारे तासभर वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतर सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास वीज पुन्हा सुरू झाली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, पहिल्या गाड्या चुकलेल्या किंवा उशिरा निघालेल्या प्रवाशांमुळे त्यानंतरच्या रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. मान्सूनच्या पहिल्याच सरींमुळे वातावरण आल्हाददायक झाले असून शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
