पालघर येथे आयटीआय निदेशक संघटनेचा ४७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

संघटनाच खरी शक्ती; निदेशकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करू : अनंत भंगाळे

पालघर : एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) पालघर येथे महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचा ४७ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे मुंबई विभाग अध्यक्ष अनंत भंगाळे, दैनिक राजतंत्रचे संपादक आणि कोकण सकाळचे निवासी संपादक मंगेश तावडे, संस्थेतील सर्व निदेशक तसेच निदेशकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक मंगेश तावडे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या ४७ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संघटनेच्या कार्याला अभिवादन करत संघटनेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

त्यानंतर संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुंबई विभाग अध्यक्ष अनंत भंगाळे यांनी, संघटनेच्या ४७ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीवर प्रकाश टाकत संघटनेने विविध काळात निदेशकांच्या न्याय्य मागण्या, सेवा विषयक प्रश्न आणि प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अनंत भंगाळे यांनी सांगितले की, “संघटनाच खरी शक्ती असून संघटित राहूनच आपण आपल्या समस्या प्रभावीपणे मांडू शकतो व त्यांचे निराकरण करून घेऊ शकतो.” त्यांनी उपस्थित निदेशकांच्या अडचणी व समस्या जाणून घेत त्यांचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच संघटनेच्या माध्यमातून सर्व निदेशकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

या प्रसंगी संपादक मंगेश तावडे यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी शासकीय सेवेमधील कर्तव्यनिष्ठा, संघटित कार्यपद्धती आणि सकारात्मक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच कौशल्य विकास क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर आणि संधींवर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी अनंत भंगाळे यांनी श्री. तावडे यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कार्यक्रमास उपस्थित राहून नामफलकास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तसेच उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

उपस्थित सर्व निदेशक व कर्मचाऱ्यांनी संघटनेची एकजूट कायम राखून संघटनेच्या बळकटीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा वर्धापन दिन सोहळा संघटनात्मक एकात्मता, बांधिलकी आणि प्रेरणादायी विचारांचा संगम ठरला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button