सातपाटी-मुरबे खाडीतील मत्स्यसंपत्तीच्या संरक्षणासाठी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे निवेदन

पालघर : सातपाटी-मुरबे खाडी परिसरातील हजारो स्थानिक मच्छिमार व आदिवासी बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असून खाडीतील मत्स्यसंपत्तीवर होत असलेल्या परिणामाबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मच्छीमार नेते राजन मेहेर यांनी मंगळवारी (२ जून रोजी) राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे तसेच मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

सातपाटी व मुरबे परिसरातील मोठ्या प्रमाणावरील स्थानिक मच्छिमार आणि आदिवासी समाजाची उपजीविका खाडीतील लहान माशांची मासेमारी, तसेच शिंपले व कालवे गोळा करण्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही काळात परिसरातील वाढते तापमान आणि तारापूर एमआयडीसीमधून खाडीत सोडले जाणारे रासायनिक मिश्रित सांडपाणी यामुळे खाडीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रदूषित पाण्यामुळे जलचरांच्या अधिवासावर परिणाम होत असून माशांचे मृत्यू, मत्स्य उत्पादनात घट आणि जैवविविधतेचे नुकसान यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. परिणामी स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होत असून आदिवासी समाजाच्या अन्नसुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. तसेच या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी तारापूर एमआयडीसीमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचा मत्स्यसंपत्तीवर नेमका काय परिणाम झाला आहे, याचा सखोल अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI) यांच्या शास्त्रज्ञ व तज्ज्ञांकडून स्वतंत्र वैज्ञानिक अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच सातपाटी-मुरबे खाडीच्या पर्यावरणीय स्थितीचा अभ्यास करून मत्स्यसंपत्तीचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक मच्छिमारांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी शाश्वत संवर्धन आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक मच्छिमार व आदिवासी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button