पालघर : महाराष्ट्र होमिओपॅथिक फिमेल डॉक्टर्स असोसिएशन, पालघर यांच्या वतीने शुक्रवारी ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. इनरव्हीलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात महिला डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका डॉ. उज्ज्वला काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स ग्रुपचे प्रेसिडेंट कमल ठाकूर, इनरव्हील प्रेसिडेंट ॲड. विनिता पाटील, डॉ. पूजा डफळ, डॉ. शमीम लुलानिया, रोटेरीयन रफिक धडा उपस्थित होते. जवळपास 25 हून अधिक डॉक्टरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यामुळे हा कार्यक्रम वैचारिक देवाणघेवाणीचा प्रभावी मंच ठरला.

सुमारे पाच ते सहा तास चाललेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र होमिओपॅथिक फिमेल डॉक्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य कोर कमिटी मेंबर डॉ. पूजा डफळ आणि त्यांच्या सहकारी महिला डॉक्टरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन करतानाडॉ. मनीषा शहा यांनी आपल्या तब्बल 30 वर्षांच्या अनुभवातून होमिओपॅथिक प्रॅक्टीस, रुग्ण हाताळणी आणि विविध केसेस संदर्भात महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित डॉक्टरांना व्यावसायिकदृष्ट्या नवे दृष्टिकोन मिळाले. तसेच डॉ. उज्ज्वला काळे यांनीही महिला डॉक्टरांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता पाटील आणि डॉ. मोनिका राऊत यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमासाठी बोईसर येथील डॉ. दिनेश ठाकरे यांचे ‘आर्या होमिओपॅथिक फार्मसी’ आणि ‘Adven Biotech Pvt. Ltd.’ यांचे प्रायोजकत्व लाभले. यावेळी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि नव्या टीमला शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्साहवर्धन करण्यात आले. हा कार्यक्रम महिला डॉक्टरांच्या एकतेचे आणि प्रगतीशील विचारांचे प्रतीक ठरला.

संस्थेचे पदाधिकारी – संस्थापक अध्यक्षा (राज्य स्तर) : डॉ. रुपाली गोसावी, महासचिव (राज्य स्तर) : डॉ. आरती नल्लू, कोअर कमिटी सदस्य (राज्य स्तर) : डॉ. पूजा डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षा : डॉ. रक्षा पाठक, उपाध्यक्षा : डॉ. धरती माळी, सचिव : डॉ. सपना संखे, सल्लागार प्रमुख : डॉ. दक्षता संखे, तसेच कार्यकारिणी सदस्य : डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. योगिता राऊत, डॉ. माला गूडसूरकर, डॉ. चंद्रिमा पॉल, डॉ. रोल्ली महत्रे, डॉ. हरिद्या भंडारी यांचा समावेश करण्यात आला आहे.



