विरार–सफाळे जेट्टीवर प्रवाशांचे हाल; शेड नसल्याने संताप, आंदोलनाचा इशारा

पालघर : मंगेश तावडे

विरार (मारंबळपाडा) ते जलसार (सफाळे) दरम्यान सुरू असलेल्या जेट्टी सेवेमध्ये प्रवाशांच्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य (मिरा भाईंदर, वसई विरार विभाग) यांनी या संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे कडक शब्दांत तक्रार नोंदवत तातडीने कार्यवाहीची मागणी समितीचे मुख्य कार्यकर्ते गोवर्धन देशमुख यांच्यासह आदींनी केली आहे. दरम्यान, एक्स अकाऊंटवर मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा त्वरित दखल घेतली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

दररोज शेकडो प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक या जेट्टी सेवेचा वापर करत असताना, प्रवाशांना उभे राहण्यासाठी साधे शेडदेखील उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कडक उन्हात महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना तासनतास उघड्यावर उभे राहून बोटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि आडोशाचा पूर्ण अभाव यामुळे प्रवाशांचे हाल वाढणार असून, सामान भिजणे, आजारपण आणि अपघाताचा धोका निर्माण होणार आहे. सध्या असलेले ऑफिस शेड केवळ कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित असून, प्रवाशांसाठी कोणतीही स्वतंत्र वेटिंग सुविधा उपलब्ध नाही.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या नियमांनुसार, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेटिंग शेल्टर देणे बंधनकारक असतानाही संबंधित कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने मोठे, सुरक्षित आणि कायमस्वरूपी शेड उभारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button