पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद, पालघर व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन (LHWRF), पालघर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या आरोग्यविषयक कार्याची छाप पाडली.कार्यक्रमादरम्यान लुपिन फाउंडेशनच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. यामध्ये नॉन-कम्युनिकेबल डिसीज (NCD) क्षेत्रातील प्रभावी कार्याबद्दल तसेच टीबी रुग्णांना पोषण किट सहाय्य उपक्रमातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान जिल्हा परिषद, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या हस्ते देण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, एडीएचओ डॉ. शशिकांत साळुंखे, तसेच सिव्हिल सर्जन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
लुपिन फाउंडेशनकडून महेश काटे (जनरल मॅनेजर), आनंद दळवी (सिनियर मॅनेजर), नाजीम पठाण (CSR मॅनेजर) व मिलिंद घोटेकर (डिस्ट्रिक्ट मॅनेजर) उपस्थित होते. तसेच CSR प्रमुख श्रीमती तुषारा शंकर, डॉ. नचिकेत सुळे, योगेश राऊत (DGM CSR) आणि व्यंकटेश शेटे (हेड, वर्कसाईड प्रोग्राम) यांच्या मार्गदर्शनामुळे फाउंडेशनचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी आणि शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी मार्गदर्शन केले.
