पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
शिक्षण विभाग पंचायत समिती पालघर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा (2025-2026) सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळ सभागृहात पार पडला. या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून आमदार राजेंद्र गावित उपस्थित होते. यावेळी गट विकास अधिकारी संजय भोये, गट शिक्षण अधिकारी शैलेश सुर्वे, विस्तार अधिकारी माधवी दवणे, राजेश माळी, विल्मा पेन, वंदना पाटील, केंद्र प्रमुख तसेच मुख्याध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालघर तालुक्यातील ३६ आदर्श शिक्षकांना त्यांचे उत्कृष्ट कार्य व शालेय जीवनातील योगदान लक्षात घेऊन आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना प्रशंसा व गौरव दिला गेला.

आमदार राजेंद्र गावित यांनी यावेळी शिक्षकांना शुभेच्छा देताना त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान गौरवले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना आधारवड मानले आणि वस्तीशाळा, पेसा भरती तसेच नॉन पेसा शिक्षकांच्या समस्यांसाठी त्यांनी नेहमीच सक्रिय राहून मार्गदर्शन केले आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी शिक्षकांनी देखील आपले अनुभव व भावना व्यक्त करत, आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांना निराकरण करण्यासाठी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून दिले. सोहळ्याचा समारोप उत्साही वातावरणात झाला.

