पालघर : शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर, पालघर जिल्हा गणित–विज्ञान अध्यापक मंडळ तसेच श्री. स. तु. कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बॉईसर रोड, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वी पालघर जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी २०२५–२६ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन श्री. स. तु. कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बॉईसर रोड, पालघर येथे करण्यात आले आहे.
ही प्रदर्शनी “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM (STEM for Vikasit and Atmanirbhar Bharat)” या विषयांतर्गत आयोजित करण्यात येत असून ०५ ते ०७ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील एकूण १०४ शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनीत विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रांशी संबंधित संशोधनात्मक व नावीन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता व नवकल्पनांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने विज्ञान व तंत्रज्ञानाकडे पाहावे, शिक्षकांनी प्रयोगाधारित व संशोधनाभिमुख शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे तसेच पालक व नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
